Marathi World

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आमदार सुरेश धस यांच्या आष्टी तालुक्यात येणार.. संतोष देशमुख प्रकरणात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष..

Devendra fadanvis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आष्टी तालुक्यात येणार… संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ते काय बोलतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आष्टी उपसा सिंचन क्र. ३ मधील शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाइन आणि बोगदा कामाचा शुभारंभ उद्या, दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वा. खुंटेफळ तालुका आष्टी जिल्हा बीड येथे संपन्न होणार आहे.

आमदार सुरेश धस यांनी या ऐतिहासिक क्षणाच्या पूर्वतयारीचा आढावा मंगळवारी 4 फेब्रुवारी रोजी प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व संबंधित सहकाऱ्यांसोबत घेतला. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेत मोठी भर पडणार असून, मराठवाड्याच्या जलसिंचन क्षमतेत महत्त्वाची वाढ होईल!

आष्टी तालुका हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असून नेहमीच आवर्षणग्रस्त प्रदेश म्हणून गणला जातो. या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीसाठी क्षमता उपलब्ध आहे परंतु केवळ पाणी कमी असल्याकारणाने या भागातील लोकांना ऊसतोड केल्याशिवाय पर्याय नाही. त्याचा परिणाम विविध सामाजिक प्रश्नावर होत आहे.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या संख्येपैकी सुमारे 30 टक्के लोकसंख्या ही आष्टी पाटोदा आणि शिरूर विधानसभा मतदारसंघातील असल्याचे बोलले जाते.

या उपसा सिंचन योजनेमुळे भीमा – कृष्णा खोऱ्यातील पावसाचे अतिरिक्त पाणी आष्टी तालुक्यातील खुंटेफळ प्रकल्पात सोडले जाणार आहे. त्यामुळे या भागातील सिंचनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

सुरेश धस यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा खूप मोठा वाटा असणार आहे, कारण मागील काही वर्षांमध्ये कुकडीचे पाणी आणि त्यानंतरही उपसा जलसिंचन योजना यावर आधारित राजकारण मोठ्या प्रमाणात झालेले आहेत.

माजी आमदार सर्वश्री साहेबराव दरेकर, भीमराव धोंडे, आणि बाळासाहेब आजबे या तिघांनीही या कामांमध्ये विविध प्रकारे भर घालण्याचा प्रयत्न केला होता.

याच विषयावरून मा. एकनाथ शिंदे यांच्या काळात माजी आमदार बाळासाहेब आजबे आणि आमदार सुरेश धस यांचा राजकीय श्रेयवाद रंगला होता.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सुद्धा या कामाचे निविदा निघाली होती परंतु तत्कालीन राजकीय परिस्थितीनुसार काही अडचणी आल्या होत्या.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरेश धस यांनी आपल्या स्वतःच्या संबंधाचा आणि राजकीय वजनाचा वापर करून या कामाला गती दिल्याचे दिसून येते.

आमदार सुरेश धस यांनी आजच्या कार्यक्रमासाठी मोठी जय्यत तयारी केलेली असून, पासष्ट हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जात आहे.

या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमासाठी आमदार सुरेश धस यांनी मोठी तयारी केलेली असताना त्या ठिकाणी भव्य सभामंडप आणि व्यासपीठाचे काम पूर्ण झाले आहेत. स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी येत असल्याने प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर मोठा ताण आहे.

स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्त्या नंतर ज्याप्रकारे आमदार सुरेश धस यांनी भूमिका घेतली त्यामुळे मुंडे बंधू भगिनी यांच्या या कार्यक्रमाच्या उपस्थिती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत स्पष्ट भूमिका मांडवी अशा प्रकारचे स्थानिक लोकांची अपेक्षा आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि आमदार सुरेश धस यांनी ज्याप्रकारे धनंजय मुंडे यांच्या बाबतीतील विविध घोटाळ्यांचे पुरावे देणे सुरू केले आहे त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विविध प्रकारच्या आरोपामुळे नामदार मुंडे या कार्यक्रमाला येतील किंवा नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या अगोदर असे स्पष्ट सांगितले आहे की धनंजय मुंडे यांच्या राजीाम्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेतील, आणि अजित पवार यांची जी भूमिका असेल तीच सरकारचे अधिकृत भूमिका असेल.

त्यामुळे आजच्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री नेमके काय बोलतात की बोलणारच नाहीत याबाबत वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत.

विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आष्टी मतदार संघातील विविध प्रलंबित कामाचा आढावा घेऊन, प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वेग दिला आहे.

राजकारण विरहित विकासाच्या अनेक गोष्टी असतात की ज्या केल्याने सामाजिक उत्थान होण्यास मदत होते अशा प्रकारचे विचार असणारे सुरेश धस यांनी या प्रकल्पामध्ये मोठे योगदान दिल्याचे दिसते.

देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यामध्ये सदर प्रकल्पाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री जवळच असणाऱ्या चैतन्य मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव या ठिकाणी चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या समाधी मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत.

चैतन्य मच्छिंद्रनाथ हे नऊ नाथांपैकी महत्त्वाचे नाथ असून त्यांची समाधी आष्टी तालुक्यातील सावरगाव या ठिकाणी आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये सर्व नाथांचे वास्तव्य होते आणि याच ठिकाणी बहुतांशी नाथांच्या समाधी मंदिरे आहेत. मच्छिंद्रनाथ देवस्थानला मायंबा असे सुद्धा स्थानिक लोक म्हणतात. याच देवस्थानाच्या उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर पाथर्डी तालुक्यात मढी येथे चैतन्य कानिफनाथ यांची समाधी आहे.

देवेंद्र फडवणीस यांच्या आगमनाने या भागातील छोटे छोटे रस्ते आणि इतर प्रलंबित कामे प्रशासनाने वेगाने आवरल्याचे दिसून येते.

त्यामुळे स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले, वर्षानुवर्ष रखडलेले कामे जर असे एखादे मुख्यमंत्री किंवा मंत्री या मार्गावरून जाणार असल्याने होणार असतील तर दर महिन्याला एकदा मुख्यमंत्री आमच्या भागातून जावेत अशा प्रकारचे मिश्किल वक्तव्य सामान्य माणसांकडून व्यक्त होत आहे.

आमदार सुरेश धस हे मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांनी स्वतः लक्ष घातल्यापासून सदर देवस्थानचा मोठा विकास झालेला असून दिवसेंदिवस त्या ठिकाणी भाविकांची प्रचंड गर्दी होताना दिसून येते. दर महिन्याच्या अमावस्येला त्या ठिकाणी भरणाऱ्या यात्रेमध्ये लाखो लोक महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात येत असतात.

देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाने त्या भागातील विकास कामाला मोठी चालना मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश धस यांच्या जवळीकते मुळे आष्टी भागात विविध विकासकामे येतील अशा प्रकारची आशा व्यक्त केली जात आहे.

आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून आष्टी तालुक्यामध्ये एक चांगली एमआयडीसी, बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा सुरू होणे, त्याचप्रमाणे इतर छोटे मोठे उद्योगांना प्रोत्साहन मिळावे आणि रस्त्याचे प्रलंबित असणारे इतर विकास कामे व्हावेत, अशी सामान्य लोकांची अपेक्षा आहे.

या कार्यक्रमासाठी शेजारच्या कर्जत -जामखेड मतदार संघातील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांसह उपस्थित राहतील. देवेंद्र फडणवीस यांचा प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर सुद्धा खूप विश्वास असल्याचे बोलले जाते. त्याचीच बक्षीस म्हणून पराभवानंतर राम शिंदे यांना विधान परिषदेमध्ये सभापती पद देण्यात आले.

आजच्या कार्यक्रमांमध्ये लोकांची उपस्थिती आणि सहभाग जास्तीत जास्त रहावा यासाठी आमदार सुरेश धस आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. या प्रकल्पामुळे आष्टी तालुक्यातील बऱ्याच भागामध्ये पाण्याचे सिंचनाची सोय उपलब्ध होणार असल्याने त्या ठिकाणी शेतीच्या नवनवीन पद्धतींचा विकास होऊन शेतकऱ्यांचे  उत्पन्न वाढेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आष्टी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये असणारा हा प्रकल्प खऱ्या अर्थाने शेतीला नवसंजीवनी ठरेल असे वाटत आहे. सुरुवातीच्या काळात, आमदार सुरेश धस हे राज्यमंत्री असताना प्रकल्पाला मंजुरी आणून काम सुरू केले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश धस यांचा पराभव झाल्यानंतर संबंधित प्रकल्प मागे पडला होता आणि त्या प्रकल्पाचे बजेट सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात येत होते.

या प्रकल्पातील काही टप्पे अगोदर पूर्ण झालेले आहेत आणि तिसऱ्या टप्प्याचे कामही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत.

त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होऊन सह्याद्री मधून भीमा आणि कृष्णा नद्यांच्यामार्गे जाणारे अतिरिक्त पावसाचे पाणी सिंचनाच्या कामाला यावे अशा प्रकारे दूरदृष्टी ठेवून हा प्रकल्प पूर्णत्वास जात आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश धस या दोघांच्याही राजकीय कारकीर्दी मधील महत्त्वाचा विकासाचा टप्पा म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाईल.

Exit mobile version